तीर्थक्षेत्र रेणुका मातेच्या चरणी माहूर गडावर गेल्या पाच वर्षापासून भजन सेवा
बातमीविश्व टिम
स्वातंत्र्य सैनिक स्व. रमेशराव रामभाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा स्व. रा.गो.टाकळकर गुरुजी स्मृती संगीत सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. नलिनी विनायक वरणगावकर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या ज्येष्ठ संगीत तज्ञ गहनीनाथ डांगे यांच्या कन्या नलिनी गहनीनाथ डांगे आहेत. त्यांना संगीताचा वारसा माहेरकडूनच मिळाला. नलिनी वरणगांवकर ह्या एक विद्यार्थी प्रिय आणि विद्यार्थ्यांवर संगीत संस्कार करणार्या एक शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दि. २८ एप्रिल २०२५ रोजी बुलडाणा अर्बन गोवर्धन सभागृहात सायंकाळी ७ वाजता स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत समारोहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संगीत विशारद, कीर्तन विशारद ह्या संगीतातील पदवी त्यांनी मिळवलेल्या असून आकाशवाणीच्या अ श्रेणी कलाकार आहेत. जळगाव आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे विविध कार्यक्रम सातत्याने सादर होत असतात. सह्याद्री दूरदर्शन वाहिनी व झी मराठी वरून त्यांचे गायनाचे व कीर्तनाचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. बालगंधर्व नाट्य मंदिर पुणे येथे संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रमात त्यांनी उत्कृष्ट कार्यक्रम सादर करून रसिकांची दाद मिळवली. मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर भुसावळ, अकोला, चिखली, बुलढाणा यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये त्यांची कीर्तन सेवा सातत्याने होत असते, तीर्थ क्षेत्र माहूर गडावर गेल्या पाच वर्षापासून त्यांची भजन सेवा सातत्याने रेणुका मातेच्या चरणी होत असते. सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या गीत रामायण कार्यक्रमात देखील त्यांनी सहकलाकार म्हणून साथ संगत केली आहे.
त्या गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या आजीव सभासद आहेत. या संगीतकार्याची दखल घेत त्यांना २०२५ सालचा स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याची घोषणा स्वर साधना संगीत विद्यालयाचे संचालक अरविंद टाकळकर यांनी नुकतीच एका पत्रकाद्वारे केली आहे. या कार्यक्रमासाठी संगीत रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
