पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिके संकटात; जयश्री शेळके यांचा सरकारवर हल्लाबोल
बुलढाणा : जिल्ह्यात मागील जवळपास ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभी पिके करपण्याची वेळ आली असताना सरकार शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी केला. शेतकरी आर्थिक संकटात असताना सत्ताधाऱ्यांकडून आढावा बैठका आणि दौरे सुरू आहेत. मात्र, प्रत्यक्ष मदतीची गरज असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप मदत जमा झालेली नाही, अशी टीका शेळके यांनी केली. सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यांचा शासन निर्णय काढला असला, तरी पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, हा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी म्हटले.
पावसाच्या खंडामुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये पीकनुकसान भरपाई तातडीने जाहीर करावी, अशी मागणी ॲड. जयश्री शेळके यांनी केली. पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
“शेतकऱ्याने पिकासाठी पैसा खर्च केला, कर्ज काढले आणि दिवसरात्र मेहनत घेतली. ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने त्याच्यावर मोठे संकट आले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित आहे. केवळ पंचनामे, बैठका आणि दौरे करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही. त्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष आर्थिक मदत जमा झाली पाहिजे,” असा हल्लाबोल शेळके यांनी केला.
दरम्यान, सरकारच्या पंचनाम्यांच्या शासन निर्णयाचा आणि शेतकऱ्यांप्रती कथित उदासीन भूमिकेचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत आणि ॲड. जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली पंचनाम्यांच्या शासन निर्णयाची प्रत जाळून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी “पंचनाम्यांची नौटंकी नको, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्या; हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करा,” अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला.
आंदोलनात उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, जिल्हा संघटक सुमित सरदार, तालुकाप्रमुख विजय इतवारे, शहर संपर्कप्रमुख सुनील भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, उपशहरप्रमुख गजानन गवई, युवासेना शहरप्रमुख मनोज चंदन, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पियंका पिंपळे, उपतालुकाप्रमुख भावना पाटील, सुनंदा खरात, सुधाकर मुंढे, निलेश तायडे, निलेश हरकल, दिलीप राजभोग, शेख रफीक, श्रीकांत जाधव, निलेश पाटील, सागर तायडे, विनोद तायडे, सतीश राजपूत, केशव भोलाने, गजानन सुरडकर, अनिता गायकवाड, अर्चना शेळके, स्मिता वराडे, शीतल सुरडकर, सोनाली वाघ यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
