भारताची 39 पदकांची कमाई; समारोप सोहळ्यात शंकर महादेवनसह भारतीय कलाकारांची सांस्कृतिक मेजवानी
ग्लासगो : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेचा समारोप आज (3 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1.30 वाजता हायड्रो एरिना येथे होणार आहे. या सोहळ्यात पुढील कॉमनवेल्थ गेम्स 2030 चे यजमानपद अधिकृतपणे अहमदाबादकडे सोपविण्यात येणार असून भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदके जिंकली. या कामगिरीच्या जोरावर भारताने पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले. बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, पॅरा अॅथलेटिक्स, ज्युडो आणि पॉवरलिफ्टिंग या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले.
समारोप सोहळ्यात ग्लासगोकडून अहमदाबादकडे राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकृत हस्तांतरण सोहळा होणार आहे. या निमित्ताने भारताच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारा 20 मिनिटांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आपल्या संगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत. याशिवाय मानुषी छिल्लर यांच्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ सादर होणार असून ऋषभ ऋखीराम शर्मा आणि रॉस आइन्स्ली यांचे विशेष द्वंद्ववादनही प्रेक्षकांचे आकर्षण ठरणार आहे.
समारोप सोहळ्यात स्कॉटलंडचा प्रसिद्ध रॉक बँड सिंपल माइंड्स आपल्या लोकप्रिय गाण्यांनी रंगत वाढवणार आहे. तसेच बेन्झ, कॅमी बार्न्स, सँडी थॉम आणि ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गुडरेम यांचीही विशेष सादरीकरणे होणार आहेत.
ग्लासगोमध्ये यशस्वीरीत्या पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आता जगाचे लक्ष अहमदाबाद 2030 कॉमनवेल्थ गेम्स कडे लागले आहे. समारोप सोहळ्यात भारताची सांस्कृतिक परंपरा आणि भावी यजमान म्हणूनची तयारी जगासमोर मांडली जाणार आहे.
