अर्जुनी मोरगाव (गोंदिया): गेल्या काही वर्षांत योग्य देखभाल आणि दुरुस्तीअभावी या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्ता आणि खड्डा यातील फरक ओळखणे कठीण होते. परिणामी दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून अनेक नागरिक किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात आरोग्य, संतुलन आणि सकारात्मकतेचा संदेश देणारे कार्यक्रम रंगत असताना अर्जुनी मोरगाव तालुक्यात मात्र योग दिनाने एका गंभीर स्थानिक प्रश्नाकडे लक्ष वेधले. अर्जुनी, माहूर, कुडा, महागाव, बोरी या मार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात राजे छत्रपती ग्रुप युवामोर्चाच्या युवकांनी रविवार,दि.२१ जून २०२६ सकाळी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून योगासने करत अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. या आंदोलनाने केवळ परिसराचेच नव्हे तर प्रशासनाचेही लक्ष वेधून घेतले आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानला जाणारा हा मार्ग सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. अर्जुनी शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेला हा रस्ता अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी वर्गासाठी हा मार्ग रोजच्या हालअपेष्टांचा विषय बनला आहे. ग्रामीण जीवनाच्या धकाधकीत हा रस्ता विकासाच्या आश्वासनांवर पडलेला प्रश्नचिन्ह ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.स्थानिक ग्रामस्थांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने सादर करून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.
मात्र, आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कृती झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.याच असंतोषाला अनोख्या आंदोलनाची जोड देत युवकांनी खड्ड्यांमध्ये बसून योगासने केली. रस्ता दुरुस्त करा, खड्डेमुक्त मार्ग द्या अशा घोषणांद्वारे त्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर बोट ठेवले. योग दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेले हे आंदोलन प्रतीकात्मक असले तरी त्यामागील वेदना आणि संताप स्पष्टपणे व्यक्त करणारे ठरले.
