बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालय परीसरात दोन वाजता आयोजन
बातमीविश्व टिम बुलडाणा
येथील आयुष विभाग व होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आज शनिवार, दि.१२ एप्रिल २०२५ रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेत जागतिक होमिओपॅथी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालय परीसरात १२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता आयोजित जागतिक होमिओपॅथी दिन कार्यक्रमाचे उदघाटन आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे.
पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.दादासाहेब कवीश्वर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजित शिरसाट यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश जतकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच होमिओ तपस्वी स्व. डॉ.अजय ढगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणार्या होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील आयुष विभाग व होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दुर्गासिंग जाधव , निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकिरण पवार, निमा युनानी फोरमचे अध्यक्ष डॉ. शफाअत रहीम यांनी केले आहे.
यांना पुरस्कार जाहीर
उल्हासनगर येथील प्रसिद्ध होमिओ तज्ञ डॉ.अमरसिंह गौतम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पळसखेडा व ग्रामीण भागात होमिओपॅथीद्वारे अनेक दुर्धर आजारांवर उपचारे करणारे प्रसिद्ध होमिओ तज्ञ डॉ. बाळासाहेब ना. महानोर, डेबको या होमिओपॅथी औषध निर्मिती संस्थेचे प्रमुख नंदकिशोर देशपांडे यांना जाहिर झाला असून ना. प्रतापराव जाधव यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.


