बुलढाण्यात हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे रविवारी जाहीर व्याख्यान

गर्दे वाचनालय, बुलढाणा आणि सेव्ह वसुंधरा यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे जाहीर व्याख्यान रविवारी (दि. २ ऑगस्ट) आयोजित करण्यात आले आहे. ‘हवामान आपल्या दारी’ या समकालीन विषयावर ते मार्गदर्शन करणार असून, हवामानातील बदल, पर्जन्यमान, शेती आणि पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर ते सविस्तर भाष्य करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ गायकवाड राहणार आहेत.

प्रमुख उपस्थितीमध्ये गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा, बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, नगराध्यक्षा सौ. पूजाताई गायकवाड, गटनेते कुणाल गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील देशमुख व ओमसिंग राजपूत, सेव्ह वसुंधराच्या संयोजक सौ. शितल सोनुने, कृषी उद्योजक रुपराव उबाळे, गर्दे वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबासाहेब वरणगांवकर तसेच सचिव तथा नगरसेवक उदयभाऊ देशपांडे यांची उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता गर्दे वाचनालयाच्या सभागृहात, बुलढाणा येथे होणार आहे.